मुंबई : मी गुन्हा काय केले आहे, हे तरी मला समजू द्या असे म्हणत इ्रडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी मीच शुक्रवारी (दि. 27) दुपारी इडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्नावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईडीने माझ्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी म्हणजेच शिखर बॅंक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेणार आहे. मात्र, मी नक्की गुन्हा काय केला ते तरी मला समजलं पाहिजे असेही श्री. पवार म्हणाले. पुढील महिनाभर मी निवडणूक प्रचारात व्यस्त असेन. मी मुंबईबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्याकार्यालयात मी स्वतःहूनच जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी असल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली
मी राज्य सहकारी बॅंकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असे वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.
दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही. अशी कोपरखळीही पवार यांनी कुणाचं नाव न घेता मारली. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असे त्यांनी सांगितले. अमरावतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आलीली होती मात्र माझ्या बाजुने निकाल लागला व प्रश्न शिल्लक राहिला नाही असे ते म्हणाले.