पिंपरी – शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही चांगल्या प्रकारे काम करत आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी चांगले कार्य करण्यात येईल. तुम्ही ज्या ज्या वेळी मला बोलवाल तेव्हा मी शहरात येईन, असे आश्वासन अमित ठाकरे यांनी दिले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष हेमंत डांगे यांच्या कार्याचे ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी हेमंत डांगे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे हे शनिवार (दि.13) रोजी “विद्यार्थी संवाद” कार्यक्रमानिमित्त आकुर्डी येथे आले होते. तत्पूर्वी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष डांगे यांच्या निवासस्थानी अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी 700 किलो फुलांचा हार त्यांच्या स्वागतासाठी आणला होता.
अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न व सूचना ऐकून घेतल्या. विविध क्षेत्रातील खेळाडू व गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सात वर्षांच्या देशना नहार या मुलीचा सत्कार करण्यात आला. ताथवडे येथील फुटबॉल टर्फ ग्राऊंड वरती घुंगराचा आवाज घेऊन अंध फुटबॉल महिला खेळाडूंसोबत फुटबॉल खेळून त्यांना प्रोत्साहन दिले. येणाऱ्या काळातील खेळासाठी आवश्यक ती मदत करण्याचा शब्द हा अमित ठाकरे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील तळागळातील विद्यार्थी मनसे विद्यार्थी सेनेशी जोडले जात आहेत. त्यामुळे शहरात मनसे विद्यार्थी सेनेचे एक मजबूत संघटन उभारले आहे. या संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट असे कार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी केले.
आकुर्डी केरला भवन येथे विद्यार्थ्यांबरोबर ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मनसे नेते किशोर शिंदे, गणेश सातपुते, मनविसे सरचिटणीस गजानन काळे, आशिष साबळे, शहराध्यक्ष सचिन चिखले, मयूर चिंचवडे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, राजु सावळे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, सुशांत साळवी, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, प्रिती परदेशी आदी उपस्थित होते.
संवाद दौरा कार्यक्रमाचे नियोजन मनविसे उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, विकास कदम, सुमित कलापुरे, आकाश लांडगे, श्रध्दा देशमुख, आकाश पांचाळ, सिध्देश सोनकवडे, निकिता दुसाणे, सोनल गावडे, राजेश आवसरे, ओंकार पाटोळे, शरण्य पाटणे, आदित्य भिलारे, दिंगबर सोळवंडे, स्वप्निल महांगरे, आदिती चावरीया, मृणाल सोमवंशी, माणिक शिंदे, शंतनू तेलंग, ओंकार रेणुसे, यश कुदळे यांनी केले.
भाजपकडून अमित ठाकरे यांचे स्वागत
भाजप आणि मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीच्या चर्चा वारंवार घडत आहेत. अशातच शनिवारी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आले असताना भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विजय फुगे यांनी त्यांचे भाजपतर्फे स्वागत केले. भाजपने अमित ठाकरे यांच्या केलेल्या स्वागताची शहरातील राजकीय वतुर्ळात चर्चा रंगली होती.