फलटण -कौटुंबिक वादातून नातवानेच आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फलटण येथे घडली. मंगल बबन शिंदे (वय 65, रा. ठाकुरकी, फलटण) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. आकाश सुखदेव शिंदे (वय 25) असे नातवाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, येथील विमानतळानजीक मंगल बबन शिंदे शनिवारी सायंकाळी शेळ्या चारण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचा नातू आकाश सुखदेव शिंदे त्याठिकाणी आला. आकाश शिंदे व मंगल शिंदे यांच्यात कौटुंबिक वाद झाला. याचे रूपांतर मारामारीत झाले असता आकाशने त्याठिकाणी पडलेला मोठा दगड मंगल शिंदे यांच्या डोक्यात मारला.
त्यानंतर मंगल शिंदे जमिनीवर रक्तबंबाळ होऊन पडल्या. दरम्यान, शेजारीच सैन्य भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या युवकांनी व फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घटनस्थळी धाव घेत पळून निघालेल्या आकाशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षय स्वत:च शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनस्थळी भेट दिली.