स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून अभ्यासिका सुरू करण्याची मागणी
पुणे – करोनामुळे शहरातील अभ्यासिका बंद आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकाच बंद आहेत. त्यामुळे शहरातील सर्व अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षकांची तयारी करणाऱ्या उमेदवारांतून होत आहे.
करोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र, “यूपीएससी’ने स्थगित केलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. त्याच धर्तीवर “एमपीएससी’ने स्थगित केलेल्या परीक्षा तारखा जाहीर कराव्या, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर “एमपीएससी’ने राज्य सेवा परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
तथापि, लॉकडाऊन लागू केल्याने बहुतांश स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमदेवार गावी गेले आहेत. त्यांना अभ्यासासाठी पुण्यात यायचे आहे. मात्र, अभ्यासिका बंद असल्याने अभ्यास कुठे करायचा, असा प्रश्न आहे. त्यामुळे शहरातील अभ्यासिका सुरू होणे आवश्यक आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. शाळा ज्याप्रमाणे टप्प्याने सुरू करीत आहात, त्यासाठी जे नियम व अटी तयार केले आहेत, त्याच अटींसह अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडे अभ्यासाठी खूप कमी वेळ आहे. त्यामुळे
अभ्यासिका सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
एमपीएससीच्या सुधारित वेळापत्रकानुसार लवकरच परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासिकेविना गैरसोय होत आहे. शहरातील बहुतांश अभ्यासिका मोठ्या असून, त्यात सामाजिक अंतर राखणे शक्य आहे. तसेच, अभ्यासिकेत मोफत मास्क व सॅनिटायझर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासिका सुरु कराव्यात व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.
– अक्षय गायकर, सात्यकी अभ्यासिका, नवीपेठ