सोरतापवाडी -कोरेगावमूळ ते प्रयागधाम रस्त्याची दुरवस्था झाली असून निधीअभावी केवळ 300 मीटर रस्त्याचे काम रखडले असल्याने रस्ता वाहतुकीसाठी वापरता येत नसल्याने प्रवाशांना खाचखळग्यातून वाहने हाकावी लागत असल्याने चालकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रयागधाम-कोरेगावमूळ रस्ताचे भूमिपूजन 14 नोव्हेंबर 2018 रोजी तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले होते. पाचर्णे यांच्या माध्यमातून एस.आर.फंडातून 2 कोटी रुपये मंजूर झाले होते. गेल्या वर्षभरापासून ठेकेदाराचे व शासनाच्या अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडून आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. व्ही. इनामदार म्हणाले की, ठेकेदाराने सुमारे 540 मीटर लांबीचे रस्त्याचे काम पूर्ण केले असून त्याला सुमारे 90 लाख रुपयांचे बिल देण्यात आले आहे. उरलेल्या 300 मीटर रस्त्याचे कामापोटी खडीकरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित खडीकरण व कॉंक्रिटीकरण ही कामे अपूर्ण आहेत. यासाठी सुमारे सव्वाकोटी रुपयांची गरज आहे. आम्ही लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून घेऊन हे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत, असे त्यांनी नमूद केले.
मागच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या रकमेची कामे मंजूर केली. पण निधीअभावी बंद पडली आहेत. या रस्त्यासाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निधीची कमरतता दूर करून लवकरच रस्ता पूर्ण करण्यात येईल. तसेच सर्वच विकासकामांची गुणवत्ता उच्चतम राखली जावी, विकासकामांच्या गुणवत्तेबद्दल कसलीही तडजोड केली जाणार नाही.
– अशोक पवार,
आमदार, शिरूर-हवेली