एक लाख 10 हजारांचा ऐवज लंपास
वाठार स्टेशन – वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील दहिगाव शिवारात पंकज माणिकराव चव्हाण (वय 39) यांच्या शेतातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल, आयपॅड, कॅमेरे. तसेच रोख रक्कम मिळून एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवार, 22 रोजी मध्यरात्री घडली.
अधिक माहिती अशी, दहिगाव (ता. कोरेगाव) येथील पंकज माणिकराव चव्हाण यांचे वाठार स्टेशन येथील शेतात घर आहे. त्या घरांमध्ये शेती साहित्य, तसेच सॉफ्टवेअरच्या कामाचे इलक्ट्रिक साहित्य होते. चव्हाण हे दिवसभर शेतातील काम करून संध्याकाळी दहिगाव येथे गावातील घरी गेले होते. जेवण केल्यानंतर दहिगाव येथेच मुक्कामी राहिले. सकाळी नेहमीप्रमाणे नऊ वाजता पंकज यांचे वडील माणिकराव चव्हाण शेतात गेले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले व आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला फोन करून रानातल्या घरात चोरी झाल्याची खबर दिली. सदर ठिकाणी गेलो असता सर्व साहित्य विस्कटलेले दिसले त्यामधील माझे दोन कॅमेरे लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड, तसेच बॅंकेचे डॉक्युमेंट्स,ड्रायव्हिंग लायसन व रोख रक्कम 78 हजार रुपये चोरीस गेल्याचे लक्षात आले. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच अधिक तपास वाठार स्टेशन पोलीस करीत आहेत.