अफगाणिस्तामध्ये हवाई हल्ल्यामध्ये ४० जण ठार झाल्याची शक्यता

कंदाहार – अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील हेलमंद प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर अफगाणिस्तानच्या विशेष फौजांनी सोमवारी रात्री हवाई छापा घातला. या हल्ल्यामध्ये मुलांसह 40 नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांकडून याची खातरजमा करण्यात येत आहे.

काबूलच्या पूर्वेकडील नंगरहार प्रांतातील एका ड्रोनहल्ल्यात ९ नागरिक ठार झाल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत ही घटना घडली आहे. अफगाणिस्तानच्या विशेष फौजांनी घातलेल्या हवाई छाप्यांमध्ये तालिबानचे १४ दहशतवादी आणि ६ परदेशी लोक ठार झाल्याचे हेलमंदच्या गव्हर्नरांनी सांगितले आहे. यात नागरिकांचे बळी गेल्याच्या या वृत्ताबाबत तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी एका निवेदनात सांगितले.

हेलमंदमधील रहिवासी आणि स्थानिक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाह समारंभाचा भाग म्हणून सायंकाळी कार्यक्रम सुरू असताना सुरक्षा दलांनी संशयित दहशतवाद्यांविरुद्ध जमिनीवरून तसेच आकाशातून मोहीम सुरू केली.

यात अफगाणी तसेच विदेशी फौजा सहभागी झाल्या होत्या, असे हेलमंद प्रांतिक परिषदेचे सदस्य मजीद अखुंदझादा यांनी सांगितले. यात सुमारे ४० लोक ठार झाले, तर १८ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, हे सर्व लोक नागरिक होते असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील संघर्षांत त्या देशाला हवाई मदत देणारा अमेरिका हा आंतरराष्ट्रीय आघाडीतील एकमेव देश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.