7 दिवसांपासून वाढ सुरूच; सोमवारीदेखील 30 पैशांची भर
पुणे – सौदी अरेबियामधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा परिणाम देशातील इंधन दरांवर झाला असून गेल्या 7 दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवारीदेखील पुण्यात इंधनाचे दर 30 पैशांनी वाढले.
सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यानंतर कच्चा तेलाचे प्रति बॅरलचे दर 60 डॉलरवरून 71 डॉलर्सवर गेले. मात्र, त्यानंतर हे दर घसरले होते. सध्या 65 डॉलर्सच्या आसपास स्थिर आहेत, क्रुड तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरू केली आहे. पुणे शहरासह राज्यात गेल्या 7 दिवसांपासून एक ते दीड रुपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत.
देशांतर्गत पुरवठा होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांची 80 टक्के पेट्रोलियम पदार्थांची भारताकडून आयात केली जाते. क्रुड तेलाच्या दरात 15 दिवसांची सरासरी काढून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज निश्चित करत असतात. सोमवारी झालेल्या दरवाढीनंतर पुण्यातील पेट्रोलचे दर 79.33 रुपये इतके झाल्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्त अली दारुवाला यांनी सोमवारी येथे सांगितले.