गांधीनगर – गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने, शनिवारी भुज येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
निलेश वालजीभाई बालिया असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याककडे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती असल्याची गुप्त माहिती गुजरात एटीएसला मिळाली. हा माणूस मेसेजिंग ऍप्लिकेशनद्वारे पाकिस्तानला संवेदनशील माहिती देत होता.तो गेल्या पाच वर्षांपासून तो भुज येथील बीएसएफच्या मुख्यालयात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागात शिपाई म्हणून कार्यरत होता.
त्याने जानेवारी 2023 मध्ये अदिती तिवारी नावाच्या पाकिस्तानी महिला एजंटशी व्हॉट्सऍपद्वारे संपर्क साधला आणि तिच्याशी मैत्री केली आणि तिला सांगितले की तो बीएसएफ कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत आहे. ” अटक केलेल्या तरुणाने चौकशीदरम्यान कबूल केले की पैशाच्या बदल्यात त्याने पाकिस्तानी महिला एजंटला संवेदनशील माहिती देण्याचे मान्य केले होते.
त्यानुसार त्याने जानेवारी ते जून या कालावधीत, बीएसएफ, भुजच्या अखत्यारीतील परिसरात सुरू असलेल्या नवीन बांधकामांविषयी गोपनीय आणि संवेदनशील माहिती शेअर केली. त्या बदल्यात, कथित महिला एजंटने ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे नीलेशच्या बॅंक खात्यात 28,800 रुपये पाठवले आहेत.