हिंगोली (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील तरुण 22 दिवसांपासून बेपत्ता होता. आज दुपारी (बुधवार, दि. 12) त्या युवकाचा मृत्यू देह डोंगरकडा बाजारपेठेच्या पत्राच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता युट्युब वर आत्महत्या कशी करावी आणि कोणत्या प्रकारामुळे विना त्रास मृत्यू येतो याची पाहणी केल्याचे युट्युब हिस्ट्रीतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी डोंगरकडा येथील बाजारपेठेच्या टिनपत्राच्या खोलीत साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेली असता त्या ठिकाणी एका युवकाचा मृत्यू गळफास घेतलेल्या परिस्थितीत आढळून आला. मात्र त्या ठिकाणी केवळ सापळाच दिसून आला. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर येथील ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड,उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख बाबर, प्रभाकर भोंग, शेख साहेद मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली
मृत प्रशांत यांच्याकडे शेती नाही. त्यामुळे आई-वडील रोज मजुरी करून उदरनिर्वाह करतात. प्रशांत याने पार्ट टाइम जॉब कसा करायचा, शेअर बाजारात हजार रुपये गुंतवले किती रुपये मिळतात याची माहिती युट्युब वर घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती व शिक्षणावर होणाऱ्या खर्चामुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रशांत अकरावीचा विद्यार्थी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरकडा येथील प्रशांत दिगंबर मोरे हा युवक डोंगरगाव कडा येथील इयत्ता अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नांदेडला क्लासेस ही लावले होते. मात्र मागील काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. त्यानंतर (ता.21) सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तो बेपत्ता झाला होता. याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंदही घेण्यात आली होती. पोलीस व त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे त्यांनी घर सोडले पूर्वी मोबाईल घरीच ठेवल्यामुळे त्याला शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
कपड्यावरून पटली ओळख
दरम्यान, घटनास्थळी आढळून आलेल्या कपड्यांवरून सदर मृतदेह प्रशांत मोरे याचा असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिसांनी त्याच्या घरी असलेल्या मोबाईलची तपासणी केली असता युट्युब वर आत्महत्या कशी करावी, कोणत्या प्रकारे आत्महत्या केल्याने कमी त्रास होतो, दोन दिवस मृत्यदेह सापडू नये यासाठी ठिकाण कसे निवडावे याची माहिती घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला