Nitish Kumar on Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राजकीय वय केवळ 20 वर्षांचे आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना मी फार महत्त्व देत नाही अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
जयप्रकाश नारायण यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या सीताब दियारा येथे शहा यांनी नुकतीच भेट दिली होती व त्यावेळी त्यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता नितीशकुमार यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया नोंदवली आहे. जयप्रकाश नारायण यांचे चेले सध्या सत्तेसाठी कॉंग्रेसच्या मांडीवर बसले आहेत अशी टीका अमित शहा यांनी तेथे नितीशकुमारांवर केली होती.
नितीशकुमार म्हणाले की, ज्यांच्या वक्तव्यावर तुम्ही मला प्रतिक्रिया विचारत आहात त्यांना जयप्रकाश नारायण यांची नेमकी माहिती तरी आहे काय, असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला.
ते म्हणाले की, आम्ही जेपी चळवळीत (1974) त्यांच्यापासूनच राजकीय कार्याची प्रेरण घेतली आहे पण ज्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केवळ 20 वर्षांपूर्वी झाली आहे त्यांना हे काय कळणार असा सवालही नितीशकुमार यांनी केला. Nitish Kumar on Amit Shah