लंडन : जगभरातील ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाचा सण असलेल्या नाताळमध्ये ख्रिसमस ट्री चे सुद्धा महत्त्व असते. या उत्सवामध्ये ख्रिस्ती बांधव आपल्या घरामध्ये ख्रिसमस ट्री आणून त्याची सजावट करतात. उत्सव संपल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ही सर्व झाडे फेकून दिली जात असल्याने त्याचा पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ही गोष्ट लक्षात घेऊनच इंग्लंडमधील एका कंपनीने आता ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमस ट्री भाड्याने देण्याची योजना सुरू केली आहे.
ख्रिस्तमसला हे झाड भाड्याने घ्यायचे आणि उत्सव संपल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे ख्रिसमस ट्री पुन्हा एकदा कंपनीला परत द्यायचे अशी ही योजना आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कंपनीने ही योजना सुरू केली आहे त्या कंपनीने ही सर्व झाडे नैसर्गिक पद्धतीने तयार केली आहेत. म्हणजे ही झाडे कृत्रिम नाहीत म्हणजेच घरात जेव्हा ही झाडे भाड्याने घेतली जातील तेव्हा त्यांना पाणी देऊनच वाढवले जाईल आणि नंतर पुन्हा जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये ही झाडे कंपनीला परत केली जातील. तेव्हा वर्षभर ही कंपनी त्या झाडांचा सांभाळ करणार आहे.
वर्षानंतर त्याच ग्राहकाला ही झाडे पुन्हा एकदा भाड्याने दिली जाणार आहेत. प्रत्येक झाडावर संबंधित ग्राहकाचे नाव असणार आहे. जोनाथन मीन्स नावाच्या एका व्यक्तीने लंडन ख्रिसमस ट्री रेंटल नावाची ही कंपनी स्थापन केली आहे. जोनाथन पूर्वी पोलीस खात्यात कामाला होता. 2017 मध्ये त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि तेव्हापासून तो ही कल्पना राबवत आहे. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्याच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना जोनाथनला अनेक वेळा ख्रिसमसचा उत्सव संपल्यानंतर रस्त्यावर फेकून दिलेली ख्रिसमस ट्री दिसत असत, त्याचा पर्यावरणाला ही त्रास होत असे ही गोष्ट लक्षात आल्याने त्याच्या मनात अशा प्रकारची कंपनी स्थापन करण्याचे विचार सुरू झाले. ग्राहकांना जी झाडे भाड्याने दिली जातात. ती परत घेतल्यानंतर मध्यवर्ती लंडनमधील एका प्लॉटमध्ये ती झाडे पुन्हा लावली जातात आणि वर्षभर त्यांची देखभाल केली जाते. मागच्या वर्षी जे ख्रिसमस ट्री तीन फुटाचे होते ते पुढील क्रिसमसपर्यंत वर्षभरात किमान चार फुटाचे तरी होते असा दावा कंपनी ने केला आहे.