नगर -करोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य व दुर्बल घटक भरडले गेले आहेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करता गरजूंना मदत देऊन, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पक्षाच्या विचारधारेने शहरात कार्य सुरु असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देऊन शहरातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, नितीन भुतारे, तुषार हिरवे, मनोज राऊत, विनोद काकडे, अभिनव गायकवाड, अमोल बोरुडे, विशाल नाबरीया, दीपक दांगट, गणेश शिंदे, अनिता दिघे, अशोक दातरंगे उपस्थित होते.
यावेळी राशीनकर म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. सावेडी परिसरात 30 वृक्षांची लागवड करुन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच अनामप्रेम संस्थेत आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.