नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देशांनी आणि मोठ्या कंपन्यां मदतीसाठी सरसावल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह जगातील सुमारे 40 देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यापैकी अनेक देशांनी वैद्यकीय मदत पाठवली आहे.
सिंगापूरहून ऑक्सिजन कंटेनरसह इतर वैद्यकीय उपकरणे काही दिवसांपूर्वी भारतात दाखल झाली आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून 550 ऑक्सिजन जनेरेटिंग प्लांट, 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 10 हजार ऑक्सिजन सिलेंडर आणि 17 क्रायोजेनिक टँकर मिळतील, असे शृंगला यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, “अमेरिकेहून येत्या काही दिवसात तीन विशेष विमाने भारतात पोहोचण्याची आशा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली आणि मदतीचे आश्वासन दिले. संयुक्त अरब अमिरातहून व्हेंटिलेटर आणि फॅविपिरावीर औषधांची खेप येणार आहे. मदतीची हात पुढे करणाऱ्या या 40 देशांमध्ये केवळ विकसित देशांनी नाही तर मॉरिशस, बांगलादेश आणि भूटान या आपल्या शेजारच्या छोट्या देशांनीही मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.”
“आपण मदत केली, आपल्याला मदत मिळत आहे, असे हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले. सध्या नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आयर्लंडहून 700 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह एक विमान येणार आहे. तर शनिवारी फ्रान्सहून वैद्यकीय उपकरणाची एक खेफ येणार आहे. रेमडेसिवीरच्या निर्मितीसाठी आम्ही इजिप्तच्या संपर्कात आहोत, जेणेकरुन आम्ही तिथून आयात करु शकतो,” असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले.
केवळ देशच नाही तर अनेक मोठ्या कंपन्याही या संकटात भारताच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कोरोना संकटात भारताच्या मदत करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेची टेक कंपनी गुगलने कोरोनाशी लढण्यासाठी भारताला 135 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. हा निधी GiveIndia आणि UNICEF ला दिला जाईल, ज्याचा वापर भारतात वैद्यकीय उपकरणे आणि कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी केला जाईल. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही भारतात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन डिवाईस खरेदी करण्यासाठी मदत करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.