पुणे: महापौरांच्या प्रयत्नांतून 21 व्हेंटिलेटर सुरू; बिबवेवाडी रुग्णालयात 8 यंत्रे कार्यान्वित

गंभीर परिस्थितीतही किरकोळ कारणांसाठी बंद होती यंत्र ः ससून डीनच्या आरोपांना उत्तर

पुणे : गेल्या वर्षी “पीएम केअर्स’ फंडातून ससून रुग्णालयाला मिळालेल्यांपैकी 25 व्हेंटिलेटर बंद असल्याचा दावा ससून रुग्णालयातर्फे करण्यात आला होता. या खळबळजनक दाव्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेत त्यापैकी 21 व्हेंटिलेटर सुरू करून घेतले आहेत. आता हे व्हेंटिलेटर्स महापालिका रुग्णालये आणि ससूनमध्ये वापरण्यात येणार आहेत.

“पीएम केअर्स’मधून पुणे शहराला मिळालेल्यांपैकी 80 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला दिले होते. त्यातील काही व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद होते. याची चर्चा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर झाली. त्यानंतर महापौर मोहोळ यांनी तातडीने ससूनचे अधिष्ठाता डॉक्‍टर मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क करून हे सर्व यंत्र महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि एका विशेष तंत्रज्ञाच्या माध्यमातून व्हेंटिलेटर सुरू करण्यात यश आले आहे.

…ही गंभीर बाब
याबाबत महापौर म्हणाले, राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या “ससून’मधील व्हेंटिलेटर बंद असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानंतर याची तातडीने दखल घेतली. हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेऊन ते अवघ्या आठ दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या अत्यावश्‍यक असलेले व्हेंटिलेटर किरकोळ कारणांसाठी मोठ्या संख्येने पूर्णपणे बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. यांपैकी
8 व्हेंटिलेटर बिबबेवाडी रुग्णालयात कार्यान्वित केले असून, इतर व्हेंटिलेटर पुणे मनपा आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत.’

पुण्याला आणखी 30 व्हेंटिलेटर मिळाले
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे व्हेंटिलेटर घ्यायला सुरुवात झाली असून, पुणे पालिकेला पहिल्या टप्प्यात “पीएम केअर्स’मधून 30 वेंटिलेटर मिळाले आहेत. तसेच शंकर महाराज मठ यांच्या माध्यमातून 5 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत, असे महापौरांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.