मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर संजय राऊतच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
आज संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे संजय राऊतांना न्यायालयात पोहचण्यास उशिर झाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात संजय राऊतांना तब्बल दीड तास उशिराने हजर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जवार 27 सप्टेंबरला घेण्याचे न्यायालयाकडून निश्चित करण्यात आले होते. न्यायालयाने राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली आहे.
19 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. आता संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबईतील गोरेगावमधील कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला होता. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची गेल्या सुनावणीत न्यायालयानं दखल घेतली होती. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रत देऊ असे ईडीने सांगितले होते. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं न्यायालयाने म्हटले.