जम्मू काश्मीर – कुपवाडा येथील लष्करी छावणीत हवालदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. संदीप अर्जुन शिंदे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते द्रांग्यारी चौकीबाल येथे तैनात होते. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडली आहे. शिंदे यांनी आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच इतर जवानांनी त्यांना श्रीनगरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचे कारण शोधले जात असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान शनिवारी रामबनमध्ये एका मेजरने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
24 तासांपूर्वी मेजरची आत्महत्या –
23 राष्ट्रीय रायफल्सच्या अल्फा कंपनीच्या महू बाल पोस्टवर तैनात असलेल्या मेजरने शनिवारी गोळी झाडून आत्महत्या केली होती. परविंदर सिंग, (प्रियदर्शनी विहार, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
शनिवारी रात्री 10.30 वाजता मेजर परविंदर सिंग यांच्या आत्महत्येची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मेजर परविंदर यांना नुकतेच 23 आरआरमध्ये कंपनी कमांडर बनवण्यात आले होते. रात्री त्यांच्या क्वार्टरमध्ये त्यांनी एके रायफलने स्वतःवर गोळी झाडली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.