गुरुग्राम : हरियाणातील हिंसाचार काही केल्या कमी होताना दिसत नाही. नूह आणि लगतच्या जिल्ह्यात हिंसाचारामुळे तणाव कायम आहे. याच दरम्यान, गुरुवारी रात्री नूह जिल्ह्यात दोन प्रार्थनास्थळांना आग लागल्याची घटना घडली आहे. एका ठिकाणी किरकोळ जाळपोळ करण्यात आली, तर आणखी एका प्रार्थनास्थळाला शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडलेल्या घटनांत कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही प्रार्थनास्थळांचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक वरुण श्रृंगला यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना, ‘एका प्रार्थनास्थळाची किरकोळ जाळपोळ करण्यात आली; तर दुसऱ्या प्रार्थनास्थळाला शॉटसर्किटने आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात बंदोबस्त वाढवला असून परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्याचे सांगितले. संशयितांना पकडण्यासाठी छापे घातले जात आहेत. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पलवल येथे काल रात्री तीन दुकाने आणि एका टेम्पोला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, नूह येथे संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. आज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल होती आणि या काळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करता आल्याचे पोलिसांनी सांगितले. नूहच्या हिंसाचारप्रकरणी ११६ जणांना अटक केली आहे.