बुलढाणा – समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा या महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आहे. नाशिकहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा बुलढाण्यातील मेहकरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकला आणि ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि वाहकाने वेळेवर ट्रकबाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र ट्रकमध्ये केमिकल असल्यानं आगीने रौद्र रुप धारण केले होते. यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग भीषण स्वरूपाची असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी चार तास लागले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
समृद्धी मार्गावरील प्रवासात घट
दरम्यान, समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत आहे. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ 1 जुलैला मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातानंतर समृद्धी मार्गावरचा प्रवास अनेक प्रवाशांसाठी धडकी भरवणारा ठरत आहे. त्यामुळेच अमरावतीवरून पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या खासगी बसेसचे तिकीट आरक्षित करण्यापूर्वीच बहुतांश प्रवासी बस कोणत्या मार्गाने जाणार, हे विचारण्यासोबत समृद्धी मार्गाने जाणाऱ्या बसचे तिकीट नकोच, असे म्हणून समृद्धीवरून प्रवास नाकारत आहेत. त्यामुळेच अमरावती, नागपुरातून पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी बसच्या समृद्धीवरून प्रवासात मागील महिनाभरात तब्बल 60 ते 65 टक्के घट आली आहे.
महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरत आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत या महामार्गावर एकूण 449 अपघातात 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली आहे.