अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना हे दोन्ही लव्ह बर्डस अधिकच रोमॅंटिक झाले आहेत. नताशाने आणि हार्दिकने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.
यामध्ये नताशा निळाशार ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तर हार्दिकने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पॅंट घातली आहे. मोकळं आकाश, हिरवंगार गवत आणि डोक्यावर सूर्यकिरण अशा सुंदर वातावरणात दोघांनीही रोमॅंटिक पोझ दिल्या आहेत. याआधी हार्दिकने घरीच काढलेला आपला फोटो शेअर केला होता.
या फोटोमध्ये एका सोफ्यावर हार्दिक बसलेला आहे आणि प्रेग्नंट नताशा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे. तर त्यांच्या शेजारी त्यांचे तीन कुत्रेही आहेत. या फोटाला हार्दिकने फॅमिली असे कॅप्शन दिले होते. जानेवारीत अभिनेत्रीने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी साखरपुडा करून सर्वांना चकीत केले होते. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती.
त्यानंतर लॉकडाऊन दरम्यानही दोघे एकमेकांसोबत राहत होते. त्याचवेळी त्यांनी लग्न केल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर हार्दिकने नताशा प्रेग्नेंट असल्याची बातमी देऊन सर्वांना चकीत केले होते. हार्दिकने नताशाच्या बेबी शॉवरचेही फोटो शेअर केले होते.