गटाराचे पाणी घरात

मेढा नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
प्रसाद शेटे
मेढा – नगरपंचायतीच्यावतीने प्रभाग क्रमांक सातमधील रस्ते आणि गटाराच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. मात्र, कागदोपत्रांप्रमाणे काम होत नसल्याने शिवसैनिकांनी ते काम बद पाडले. त्यानंतर यावर तोडगा न काढता ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पळ काढला. मात्र, याचा फटका प्रभाग सात मधील नागरिकांना रविवारी झालेल्या पावसात बसला. मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे गटारातील सर्व पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले.

पावसाळ्यापूर्वीच शहरातील गटारांचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या काम हे दुसऱ्या वर्षातील जुन महिना उलटला तरी पूर्णत्वास गेलेले नाही. विशेष म्हणजे ठेकेदाराने काम सोडल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे काम दुसऱ्या ठेकेदाराकडून पूर्ण करुन घेणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे याचा फटका नागरिकांना नाहक सहन करावा लागला. रविवारी जिल्ह्यातच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तसाच तो मेढा येथेही झाला. पावसामुळे रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. गटारेही तुडुंब भरुन वाहू लागली. प्रभाग सातमध्ये गटारांचे काम अर्धवट राहिल्याने गटारातील सर्वपाणी नागरिकांच्या घरात घुसू लागले. गांधीनगर येथील शशी शिंदे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहेच शिवाय महत्वाची कागदपत्रेही भिजल्याने खराब झाली आहेत.

या प्रकारानंतर नगर पंचायतीच्या प्रशासनाने संबंधित नागरिकांच्या घराची पाहणी करुन नुकसानीची माहिती घेणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गटारचे पाणी इतक्‍या मोठ्या प्रमाणात घरात घुसण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात असून या सर्व प्रकाराला प्रशासनच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)