अनावश्‍यक टीका करू नका; आठवलेंनी विरोधकांना सुनावले

पुणे – “कशी करायची नाही टीका…कशी करायची नाही ते माझ्याकडून शिका’ अशा खास शैलीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले. यावेळी आठवले यांनी अनावश्‍यक टीका करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका, असा टोलाही विरोधकांना लगावला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आठवले यांच्या हस्ते रविवारी रात्री प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनील कांबळे, सुनीता वाडेकर, विलास आढाव आदी उपस्थित होते.

“पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला सत्कार विनम्रपणे स्वीकारतो. जीवनातील आवश्‍यक असणारे असणारे महत्त्वाचे संस्कार माझ्यावर पुणे शहरामध्ये झाले. त्यामुळे या पुरस्काराचा विशेष आनंद आहे,’ अशी भावना महातेकर यांनी व्यक्त केली. “नुकतेच मिळालेले मंत्रीपद म्हणजे जवळपास जीवनगौरव दिल्यासारखे वाटते,’ असे महातेकर यांनी नमूद केले. यावेळी महातेकर यांनी पुण्यातील आठवणी उलगडल्या.

महापौर मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. सुनिता वाडेकर यांनी आभार मानले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मानपत्राचे वाचन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.