इब्टाचे एकनाथ व्यवहारे ः तीन वर्षांनंतर सत्ताधाऱ्यांना सभासदांची आठवण
नगर -“शिक्षक बॅंक आणि विकास मंडळ खासगी मालमत्ता असल्यासारखे गुरूमाऊली मंडळ तिचा वापर करत आहे. किती खाऊ आणि किती ठेवू, यातूनच सत्ताधारी संचालक मंडळामध्ये बेबनाव सुरू झाला आहे. रविवारी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्र परिषदेत हा बेबनाव त्यातूनच समोर आला आहे. शिक्षक बॅंकेच्या कारभारात सत्ताधारी पारदर्शकता बाळगत नसल्याचा हा भक्कम पुरावा आहे. सभासदांनी या प्रकाराचा जाब विचारायला सुरूवात केल्याने गुरूमाऊलीचे हुकुमी चेहरे लपू लागले आहे,’ असा टोला इब्टा प्रणित बहुजन मंडलाचे जिल्हा सचिव एकनाथ व्यवहारे यांनी दिला आहे.
कर्ज मंजुरीसाठीच्या बैठकांवर खर्च जास्त
कर्ज वाटपात खंड पडू दिला नाही, या दाव्याचा समाचार घेताना एकनाथ व्यवहारे म्हणाले, शाखा पातळीवरच कर्ज मंजूर केले जाते. ही कर्जमंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांनी किती बैठका घेतल्या आणि त्यावर किती खर्च दाखविला याचा हिशोब सभासदांसमोर ठेवला, तर तो दुपटीत निघेल. सत्ताधाऱ्यांनी कर्ज वाटपात खंड पडू न देता स्वतःवरचा खर्च चांगल्याच पद्धतीने वाढविला आहे. हा खर्च देखील सभासदांच्या ठेवीमधून मिळालेल्या व्याजातलाच आहे, याकडेही एकनाथ व्यवहारे यांनी लक्ष वेधले.
व्यवहारे यांनी पत्रकात म्हटले आहे, “सत्ता परत मिळणार नाही, या भीतीतून निवृत्त होत असलेले गुरूमाऊलीचे रावसाहेब रोहोकलेंनी सत्तेची पेरणी सुरू केली आहे. त्यातूनच त्यांना सत्तेच्या तीन वर्षानंतर सभासदांची आठवण झाली आहे. तीन वर्षानंतर कर्जावरील 0.25 टक्के व्याज माफ केले आहे. सत्ताधाऱ्यांना तीन वर्षानंतर खाऊगिरीतून वेळ मिळाला आणि सभासदांची आठवण झाली.’ सत्ताधाऱ्यांनी बॅंकेचा वापर खासगी मालमत्ता, म्हणून सुरू केला आहे. सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव हा त्यातील एक भाग आहे. “किती खाऊ आणि किती ठेवू’, हे बेबनावचे त्यामागील खरे कारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. बॅंकेत शिक्षकांच्या ठेवी आहेत. त्यावरील व्याज हे शिक्षक सभासदांची कमाई आहे. त्या प्रत्येक पैशाचा हिशोब विचारल्याशिवाय राहणार नाही. बॅंकेचा वापर खासगी मालमत्ता म्हणून केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा व्यवहारे यांनी पत्रकातून दिला आहे.अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी गुरूमाऊली मंडळाने जाहीरनाम्यानुसार कारभार केल्याचा दावा केला आहे. त्यावर व्यवहारे यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “रोहोकले यांनी सत्तेच्या काळातील म्हणजेच गेल्या तीन वर्षाचे लेखापरीक्षणाचे अहवाल सभासदांसमोर मांडण्याचे आवाहन केले आहे. गेल्या 23 वर्षाच्या काळात बॅंके आता 3 टक्के फरकाने कामकाज करत आहे. त्याचे फुकाटचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचे काम नाही.
इमारतीसाठी जमलेल्या निधीचा हिशोब द्या!
विकास मंडळाच्या इमारतीसाठी सभासदांच्या एक हजार रुपयांच्या ठेवीवर 7.75 टक्के व्याजदर देणार आहे. हे व्याजदर म्हणजे सभासदांना आमिष आहे, असा टोला एकनाथ व्यवहारे यांनी लगावला. विकास मंडळाची इमारतीसाठी जमा केलेल्या निधीचा हिशोब सभासदांसमोर ठेवण्याचे आवाहन व्यवहारे यांनी केले आहे. त्यासाठी स्वतंत्र बैठक ठेवा. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे “दूध का दूध आणि पाणी का पाणी करू’, असेही त्यांनी सांगितले.
सभासदांनी ठेवलेल्या ठेवींमुळेच हे शक्य झाले आहे.’ निव्वळ नफा सत्ताधाऱ्यांच्या कामकाजामुळे नाहीतर सभासदांच्या ठेंवीमुळे झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सात महिन्याभरापूर्वी निर्बंध घातले होते. त्यावेळी ठेवी काढण्याचा सपाटा सभासदांनी चालविला होता. त्यावेळी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांनी बॅंकेत ठेवी ठेवण्याचे आवाहन आणि ठेवी सुरक्षित असल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हे देखील रोहोकले यांनी विसरू नये, असेही ते व्यवहारे यांनी म्हटले आहे. आबा लोंढे, रामभाऊ गवळी, भागवत लेंडे, अरुण मोकळ, बाळासाहेब पोळ, राजेंद्र रोकडे, सुहास पवार, राजेंद्र कडलक, विजय फाटकर, सुभाष भिंगारदिवे, गौतम मिसाळ, अनिल साळवे, संतोष शिंदे आदींनी हे पत्रक काढले आहे.