कोरेगाव – अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेनिमित्त कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. श्रीराम मंदिराबरोबरच स्थानिक ग्रामदैवतांच्या मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी रांगोळी काढून घंटानाद, शंखनाद,श्री राम पूजा, आरती, प्रसाद वाटप, राम रक्षा पठण, भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम मंदिरासह विविध मंदिरांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात ठिकठिकाणी श्रीराम प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. महिला वर्गाने रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र आणि राम नाम जप करुन, प्रभू श्रीरामची आरती केली. प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे फाटा येथे नरेंद्र मोदी चौकामध्ये दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी फटाक्यांची आतषबाजी करत जिलेबी वाटप करण्यात आले. भाजपचे युवा कार्यकर्ते आदित्य गवळी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील वाहनधारक व नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले.
कोरेगाव शहरात सायंकाळी सहा वाजता बाजारपेठ येथील श्रीराम मंदिरापासून हजारो भाविकांनी श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढली. यावेळी लहान मुलांनी श्रीराम आणि सीता, हनुमान यांची वेषभूषा केली होती.कलश, रथ, डीजे, ढोल ताशाच्या गजरात फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पोषाख परिधान केलेले शहरवासीय, भगवे ध्वज-फेटे-स्कार्फ-टोप्या, पारंपरिक वाद्ये व आधुनिक ध्वनी यंत्रणेचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि ‘जय श्री राम’ चा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रा मार्गावर शहरवासियांनी शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले.
लवाजम्यासह निघालेल्या यात्रेतील श्री रामांचा रथ लक्षवेधक होता. अयोध्येतील श्री राम प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते. स्त्यावर ठिकठिकाणी भगवे ध्वज व श्री रामांचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. एका बग्गीमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते बसले होते. पारंपरिक वेषात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे, श्रीराम लिहिलेल्या टोप्या, स्कार्फ परिधान केले होते. हातात ध्वज घेऊन ‘जय श्री राम’ चा अखंड जयघोष केला जात होता.