नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कुकडेश्वर मंदिराच्या जीर्णद्वारासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून पूर (ता. जुन्नर) येथील कुकडेश्वर मंदिराच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी 2 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी खासदार निधीचा कुठलाही संबंध नसल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
आमदार अतुल बेनके यांनी म्हटले की, कुकडेश्वर मंदिरासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक व भाविकांकडून होत होती. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना सूचना करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याची सूचना केली होती.
जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे याबाबत बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी पुरातन विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागीय संचालक समा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ऐतिहासिक व पुरातन कुकडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करणे, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, अंतर्गत रस्ते करणे, डिजिटल दर्शन, परिसर सुधारणा करणे, स्वच्छता करणे आदी कामांसाठी निधी मंजूर झाला असून त्याची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले.