सरकारकडून आकड्यांची फेकाफेक – देवेंद्र फडणवीस

मुंबई – राजकारण बाजूला ठेवा, ही राजकारणाची वेळदेखील नाही. पण अशा परस्थितीत करोनाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याऐवजी सरकार आकड्यांची फेकाफेक करत आहे. अशा परिस्थितीत सरकारला नक्कीच आरसा दाखवावा लागेल. सरकारला सांगावे लागेल की, करोनाविरोधात लढाई सुरु आहे. त्यादृष्टीने योग्य कारवाई करा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, ते नवे आहेत, त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले. मात्र या परिस्थितीत कठोर निर्णयाची आवश्‍यक आहे. तो निर्णय ते घेताना दिसत नाहीत, असे ते म्हणाले.
देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील परिस्थिती तुम्ही रोज बघत आहात. ज्याप्रकारे राज्यात करोना वाढत आहे. देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

याशिवाय देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांचे हेरफेर करायची. काल एका दिवसात 8 हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचे दाखवले आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, अशी टीका त्यांनी केली.

लोक डिस्चार्ज होत असतील याचा आम्हाला आनंद आहे. लोकं चांगली झालीच पाहिजेत. पण, नंबर गेम करण्यापेक्षा आज मुंबईतील लोकांना बेड्‌स, ऑक्‍सिजन आणि रुग्णवाहिकादेखील मिळत नाही, रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई होणं अपेक्षित आहे, अशी मागणी त्यांनी केली.

आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणार हे आयसीएमआर आणि केंद्राकडून आलेल्या पथकाने देखील सांगितले होते. पण आपण काय व्यवस्था केली? आम्ही रेस कोर्स, एमएमआरडी, डोममध्ये बेड्‌स तयार केले, असे सांगितले जाते. हे सर्व मिळून एकूण 4 हजार बेड्‌स आहेत. आपल्याकडे रोज दीड हजार रुग्ण वाढत आहेत. त्या 4 हजार बेड्‌ससाठी डॉक्‍टर, नर्सेस, नाहीत. त्यामुळे ते रुग्णालयं सुरुच होऊ शकलेले नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.