बाळासाहेब सोनवणे
शिर्डी – देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्य सरकानेही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच साईबाबा संस्थानला कोविड केयर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साई संस्थानने साई आश्रम दोन, या ठिकाणी युद्धपातळीवर हे सेंटर उभारणीचे काम सुरू केले आहे. सदर काम दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.
देशात करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. तसेच करोना हेल्थ सेंटर उभारून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्र भीषण आहे. देशात सर्वांत जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केयर सेंटर उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून, आजपर्यंत करोनाबाधितांचा आकडा शंभरावर गेला आहे. तसेच दहा जणांचा मृत्यूही झाला आहे.
सर्व बाबींची गंभीर दखल घेत शासनाने साईबाबा संस्थानला कोविड केयर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्याचे आदेश 15 एप्रिल रोजी दिले आहेत. त्यानुसार साई संस्थानने साई आश्रम दोन या ठिकाणी युद्धपातळीवर हे सेंटर उभारणीचे काम सुरू केले आहे. हे काम आगामी एक-दोन दिवसांत हे सेंटर सुरू होणार आहे.
साई आश्रमला रुग्णालयाचे स्वरूप प्राप्त झाल्याने राहाता तालुक्यातील रुग्णांवर तेथे उपचार करण्यात येणार आहेत. कोविड केअर सेंटरच्या ओपीडीत चोवीस तासांत एकूण तीन शिफ्ट असणार असून, यामध्ये एकूण बारा तज्ज्ञ डॉक्टर तैनात असणार आहेत. त्यांच्याबरोबर बारा नर्स, बारा वॉर्डबॉय व बारा स्वीपर काम करणार आहेत. डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये नऊ तज्ज्ञ डॉक्टर्स, 18 नर्सेस, बारा वॉर्डबॉय व बारा स्वीपर तैनात करण्यात येणार आहेत. या सर्वांना प्रशिक्षण देऊन अत्याधुनिक साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे आता करोनाच्या लढ्यात साई संस्थानची मेडिकल टीम सज्ज असून, याचा अनेक रुग्णांना लाभ होणार आहे. आजारी असलेल्या रुग्णांची तपासणी, रिपोर्ट व त्यानुसार उपचार केले जाणार आहे.