पुणे जिल्ह्यासाठी दररोज 300 एसटीचे नियोजन
एकावेळी 22 जणांना प्रवास करता येणार
पुणे – लॉकडाऊनमध्ये स्थगिती मिळालेली “लालपरी’ची प्रवासी सेवा टप्प्याटप्प्यात सुरू होत आहे. येत्या सोमवारपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची तालुकांतर्गत वाहतूक सुरू होणार आहे. नव्या नियमांनुसार एका गाडीमध्ये केवळ 22 जणांना प्रवास करता येणार असून, तालुकांतर्गत धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आगारांकडून जाहीर करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये एसटीची प्रवासी सेवा स्थगित केली होती. लॉकडाऊनमुळे शहराच्या विविध भागांत अडकलेल्या कामगार, विद्यार्थी, पर्यटक आदींना परराज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश होता. या कालावधीत पुणे विभागातून देखील एसटीच्या सुमारे 1, 893 फेऱ्या झाल्या. यातून जवळपास 40 हजार नागरिकांनी प्रवास केले.
लॉकडाऊन 5 मध्ये विविध व्यवसाय, उद्योग आदींना परवानगी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांतर्गत तालुकांतर्गत वाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेता, येत्या सोमवारपासून ही वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि पुणे स्टेशन वगळता पुणे जिल्ह्यातील आगारांतून वाहतूक सुरू होणार आहे. यामध्ये नारायणगाव, शिरुर, सासवड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर, तळेगाव, बारामती, दौंड या डेपोंचा समावेश आहे. यासाठी दररोज सुमारे 300 गाड्यांचे नियोजन केले असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून यामध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
लॉकडाऊन 4 च्या शेवटच्या टप्प्यात आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली होती. तर मागील दोन आठवड्यांपासून एसटीच्या जिल्हांतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. मात्र अद्यापही प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. महापालिका हद्द वगळता अन्य ठिकाणांहून धावलेल्या गाड्यांतून सुमारे 2 हजार 500 जणांनी प्रवास केला.