नगर, -वाढदिवस साजरे करताना सर्वच नेत्यांनी आता सामाजिक बांधिलकी जपायला हवी. नाशिवंत असलेल्या हार-तुऱ्यांऐवजी वाढदिवसानिमित्त यापुढे वंचित घटकाला कसा फायदा होईल, अशा उपक्रमांचा विचार व्हावा. वंचित घटकांच्या जीवनात निर्माण केलेला छोटासा आनंदही खूप समाधान देऊन जातो, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अमित मुथा, गौतम मुथा, विशाल गुंदेचा, प्रशांत बोरुडे, रितेश कोठारी, मनिष फुलडहाळे यांच्यावतीने आज महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शरद क्यादर, बाजार समितीचे अध्यक्ष अभिलाष घिगे, उपाध्यक्ष संतोष म्हस्के, राजेंद्र एकाडे, हरिभाऊ कर्डिले, राजेंद्र बोथरा, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, शिवाजी कार्ले, बाळासाहेब निमसे, भैरवनाथ कोतकर, अभय आव्हाड, सचिव अभय मिसे, संतोष कुलट आदी यावेळी उपस्थित होते.
अमित मुथा म्हणाले, “”दरवर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी अपंगांना सायकल वाटप करण्यात आले होते. यावेळी गरजू महिलांना हाताला काम मिळावे, यासाठी शिलाई मशिन वाटप करण्यात आले. सभापती अभिलाष घिगे म्हणाले, “”बाजार समितीच्यावतीने आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.”
शाळानिहाय होणार मदतीचे वाटप!
आमदार जगताप यांच्या वाढदिवस आज विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. गेल्या वर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत व्हावी, यासाठी जगताप यांच्याकडून आवाहन करण्यात येते. त्यास या वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी शालेय साहित्य भेट दिले. ते शाळा सुरु झाल्यानंतर गरज पाहून शाळानिहाय ते शालेय साहित्य वाटण्यात येणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.