फलटण -फलटण येथे पालिकेची मालकी असलेल्या इमारतीतील करोना हॉस्पिटलमधील गैरसोयींबाबत दैनिक “प्रभात’ने सोमवारी (दि. 20) प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या दणक्यानंतर प्रशासन हडबडले. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळू लागल्या आहेत. फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व जण “प्रभात’ला धन्यवाद देत आहेत.
फलटण पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या करोना हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तेथे दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नाहीत, असे वृत्त दैनिक “प्रभात’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
त्याची तात्काळ दखल घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी तेथे पिण्याच्या पाण्यासाठी दोन ऍक्वागार्ड बसविले असून 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे. पाच हजार लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकीही इमारतीवर बसविण्यात आली असून आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय केली आहे. 24 तास वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी महापारेषण कंपनीकडून बॅकअप वाढविला आहे. डॉक्टरांना बसण्यासाठी अद्ययावत रूमची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.