281 महाविद्यालयांकडून नोंदणी : 236 ऍप्रुव्ह
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सराव करण्याकरीता आतापर्यंत 19 हजार 209 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अर्ज भरताना चूका टाळता याव्यात यासाठी या सरावाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे 1 जुलै रोजी वेळापत्रक जाहीर झाले. त्यानंतर पुन्हा 15 जुलै रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवली. पुणे विभागात एकूण 304 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील 281 महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 236 महाविद्यालयांची नोंदणी ऍप्रुव्ह झाली आहे. 45 महाविद्यालयांनी अद्यापही आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. या संबंधित महाविद्यालयांना ई-मेलवर स्वतंत्रपणे स्मरणपत्र पाठवले असून त्रूटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागात 29 महाविद्यालये आहेत. यातील काही शासनाची मान्यता घेतली असली तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाली नाहीत. ही महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत येण्याची शक्यता कमी आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 22 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर 24 जुलैपर्यंत महाविद्यालयांनी नोंदवलेली माहिती तपासून अंतिम करण्याची कार्यवाही होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी प्रत्यक्षात 26 जुलैपासून संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
…तर सरावाची माहिती नष्ट होणार
दरवर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना अडचणी येतात. त्यामुळे माहिती भरताना बऱ्याच चूका होत असल्याचे आढळून येत होते. यंदा या चूका टाळता याव्यात यासाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी 16 जुलैपासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 24 जुलैपर्यंत ती सुरू राहणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरण्यापूर्वी ही सरावाची माहिती नष्ट करण्यात येणार आहे.