कवठे/शिरवळ -पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अक्षय सुनील मोहिते (वय 22, रा. अजनूज, ता. खंडाळा, मूळ रा. चोचिंदे, ता. महाड, जि. रायगड) याने असिफ गुलाब शेख (वय 23, रा. पारगाव-खंडाळा) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि. 19) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पारगाव-खंडाळा एसटी डेपोसमोर घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय मोहिते व त्याचा साथीदार अमित चव्हाण (रा. दूध डेअरीजवळ, पारगाव) यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मोहिते हा रविवारी रात्री 8.20 वाजता आसिफ शेख याच्या घरी आदित्य अपार्टमेंटमध्ये गेला. आपण जेवायला जाऊ, असे सांगून त्यास मोटारसायकलवर बसवून अक्षय एसटी डेपोसमोर आला. असिफचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय अक्षयला होता. याच कारणावरून दोघांची वादावादी झाली. रागाच्या भरात अक्षय मोहितेने असिफ शेखवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
त्यात असिफच्या छाती, बरगड्या व मांडीवर वार झाल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली.