गोव्यातील डॉक्‍टरांचे पथक विशेष प्रशिक्षणासाठी पुण्यात

पुणे – करोनाने देशातील अनेक राज्यांना ग्रासले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी गोवा येथील वैद्यकीय सेवेचे पथक नौदलाच्या मदतीने पुण्यात दाखल झाले असून, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था(एनआयव्ही) येथे या पथकाला प्रशिक्षण दिले जात आहे.

गोवा येथे करोना विषाणू प्रदूर्भावाचा सामना करण्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय संसाधने आणि चाचणी केंद्रांच्या उभारणीसाठी गोव्याच्या वैद्यकीय पथकाला प्रशिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे. गोवा मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलाजी विभागाचे प्रमुख डॉ. सॅव्हिओ रौड्रीग्ज यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्‍टरांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. एनआयव्ही येथे दि.27 मार्चपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. या पथकाने काही नमुनेदेखील तपासणीसाठी आणले आहेत.

या डॉक्‍टर्सना पुण्यात आणण्यासाठी नौदलाचे विशेष सहकार्य लाभले. नौदलाच्या डॉर्निअर या विमानाद्वारे आयएनएस हंसा या गोव्यातील नौदल तळावरून उड्डाण घेत, या वैद्यकीय पथकाला पुण्यात पोहचवले. 24 मार्च रोजी गोवा येथील नौदल प्रमुखांना गोवा राज्यशासनाने मदत मागितली होती. त्यावर तातडीने हालचाल करत नौदलातर्फे आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करत ही मदत पुरविण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौदलातर्फे या पथकाला पुन्हा एकदा गोव्यात पोहचवले जाणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.