सणसवाडीतील 100जण होम क्‍वारंटाइन

शिरूर – शिरूर तालुक्‍यातील परदेशातून आलेले एकूण 35 जणांना होम क्‍वारंटाइनचे शिक्‍के मारून त्यांना घरीच राहण्याची सांगितले आहे. सणसवाडी येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संपूर्ण गल्लीतील शंभर जणांना होम क्‍वारंटाइनमध्ये ठेवले आहे. त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. 

शिरूर तालुक्‍यात तालुका प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. सणसवाडी येथे प्रथमच करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर, सणसवाडी या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

परंतु तिन्ही प्रशासनाच्या वतीने या भागात खबरदारीचा उपाय सुरू केला आहे. औषध फवारणी, नागरिकांची जनजागृती आदी कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. प्रशासन या भागातील नागरिकांवर लक्ष ठेवून आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील, वैद्यकीय अधिकारी रोकडे उपस्थित होते. शिरूर ग्रामीण रुग्णालयात सोळा बेडची व्यवस्था केली आहे. शहरातील विविध हॉस्पिटलमधील एकूण 15 व्हेंटिलेटरही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.