मुळशी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण कासार आंबोली, ता. मुळशी येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत दिनांक ६ रोजी पार पडले. सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेले भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी त्यांना सहाय्य केले.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मुळशी तालुक्यात निवडणुकीसाठी २२६ मतदान केंद्रावर मतदान होणार असून याकरिता ९२३ कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे यासाठी मुळशी तहसिल कार्यालय तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरू असून योग्य ती काळजी घेऊनच नियोजन केले आहे. मतदान केंद्रावर मतदानादिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लाईव्ह रेकॉर्डिंग केले जाणार आहे.
या मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य शासकीय गाडीनेच योग्यरीत्या न्यावे लागणार आहे. यासाठी कोणतीही खाजगी गाडी वापरायची नसून मतदान केंद्रावर पुरुष कर्मचाऱ्यांना आदल्या दिवशी जावेच लागणार आहे, महिला कर्मचाऱ्यांना मात्र मतदानादिवशी सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावर हजर रहावे लागणार आहे.
त्यानंतर सकाळी ५.४५ मिनिटांनी मॉक पोल (मतदान यंत्राची चाचणी) उमेदवारांच्या पोलींग एजंट किंवा त्यावेळे पर्यंत ते हजर नसतील तर त्यांच्याविना घ्यावाच लागणार आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला किमान १ मत ते जास्तीत जास्त एकूण ५० मतांपर्यंत हा पोल घेऊन मतदान यंत्राची चाचणी होणार आहे.
मतदान यंत्र कसे जोडावे, कसे हाताळावे याबद्दल परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण एलईडी स्क्रीनवर देण्यात आले. मतदान केंद्रावरील नेमून दिलेल्या जबाबदारीचे पालन, कर्तव्ये, अधिकार याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन किंवा तत्सम परिस्थिती उद्भवली असता काय करावे, हे सांगण्यात आले. विशेषतः मतदान केंद्रात कोणालाच मोबाईल नेऊन देण्यात येणार नाही व पोलींग एजंटला देखील त्याच्याजवळ असलेली मतदान नोंद झाल्याची यादी मतदान केंद्राच्या बाहेर नेता येणार नाही, हे कचरे यांनी आवर्जून सांगितले.
या प्रशिक्षणात हजार-बाराशेच्या आसपास प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले. सकाळ व दुपार अशा एकूण दोन सत्रात प्रशिक्षण पार पडले. यावेळी वातानुकूलित कुलर्सची मोठी सोय करण्यात आली होती, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही. यावेळी महसूल विभागातील सहाय्यक निवडणूक अधिकारी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, मुळशी तहसिलदार रणजित भोसले, अप्पर तहसीलदार प्रियांका मिसाळ, मंडलाधिकारी, तलाठी,शिपाई कोतवाल आणि इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.
यंदा ब्रेल लिपीतील आकडे बटणाशेजारी –
यावेळी अंध बांधवांसाठी मतदान यंत्रावर विशेष सोय केली आहे. मतदान यंत्रावरील बटणाशेजारी ब्रेल लिपीतील आकडे दिले असून त्यामुळे अंध बांधवांना कोणाच्याही सहाय्याशिवाय मतदान करता येणार आहे.