नवी दिल्ली : कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे याच व्हिडीओवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या आरोपाला आता भाजपकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. गुलाम नबी आझाद हे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे सांगत आझाद यांच्यावर पलटवार केला आहे.
भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी आझाद यांच्यावर पलटवार करत अजित डोभाल यांच्याविषयी आझाद यांनी केलेल्या आरोपावर माफी मागावी असेही त्यांनी म्हटले. कलम 370 हटवल्याच्या विवादानंतर गुलाम नबी आझाद आज श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात ते कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आलं आहे. काही कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य आहे. तर कॉंग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.