आजपासून दररोज पाणी

पिंपरी – महापौर राहुल जाधव यांनी पवना धरणाचे जलपूजन केल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गुरुवारपासून (दि. 8) शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. मावळसह उद्योगनगरीची भिस्त पवना धरणावर आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्येच धरण शंभर टक्के भरले. परंतु, पावसाने लवकरच परतीची वाट धरली. त्यामुळे अवेळीच नदीऐवजी धरणातून पाणी उचलण्याची वेळ आली. त्यामुळे महापालिकेला दिवाळीपासूनच अंशतः पाणी कपात करावी लागली. यंदा तीव्र स्वरुपाच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्याचाही परिणाम पाणी साठ्यावर झाला. यावर्षी पहिल्यांदा पवना धरणातील पाणी साठ्याने नीचांक गाठला होता.

आजपर्यंतच्या इतिहासात सर्वांत कमी पाणी उरल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी अद्याप पाणीकपात सुरूच आहे. शहरात पूरही येऊन गेला, तरी पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे.
जून महिना सुरू झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरू होऊन पाणी कपातीपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. परंतु, पावसाने चांगलीच ओढ दिली. उलट उन्हाचा पारा दिवसें-दिवस चढता राहिला. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झाली. धरणात अवघा तेरा टक्केच पाणी साठा उरला.

जून महिना सरत आला तरी पाऊस सुरू न झाल्याने शहरवासियांची चिंता वाढली होती. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्‌यात मॉन्सूनचे आगमन झाले. आठवडाभराच्या तुरळक हजेरीनंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून पावसाने धरण क्षेत्रात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्याची वेळ आली. धरण नव्वद टक्के भरताच पाणी कपात मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र, गतवर्षीचा अनुभव घेता शंभर टक्के धरण भरल्याखेरीज पाणी कपातीबाबतचा निर्णय न घेण्याची भूमिका आयुक्त हर्डीकर यांनी घेतली होती. जलपूजन झाल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्याने दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.