सामान्यातला असामान्य गणितज्ञ

देशामध्ये आजही कोणाला शास्त्रज्ञ व्हावेसे वाटत नाही अशी स्थिती आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांवर विशेष लक्ष देत सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थ्यांना ज्ञान होणे आवश्‍यक असते. ज्या काळामध्ये शिक्षणाबद्दल म्हणावी अशी जागृती नव्हती, त्या काळामध्ये एका अत्यंत साधारण कुटुंबात जन्मलेल्या श्रीनिवास रामानुजन यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर जगाला स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले.

रामानुजन यांना उणेपुरे तीन दशकांचे आयुष्य लाभले. मात्र, या अगदी कमी आयुष्यामध्ये त्यांनी अत्यंत प्रतिभासंपन्न आणि भरीव असे काम करून ठेवले आहे. उभे आयुष्य त्यांनी संशोधनात व्यतित केले. सुरुवातीपासूनच त्यांनी त्रिकोणमितीचा अभ्यास चालू केला होता. नैसर्गिकरीत्या त्यांना गणिताची आवड होती. या आवडीतूनच त्यांचा सामान्य विद्यार्थी ते एक जगप्रसिद्ध गणितज्ञ या प्रवासाची सुरुवात झाली. आपल्या गणिताच्या आवडीपोटी त्यांनी इतर कोणत्याच विषयाचा अभ्यास न केल्यामुळे त्यांना इंग्रजीसह इतर विषयात अनुत्तीर्ण व्हावे लागले होते. मात्र, तरीही त्यांनी आपल्या गणिताच्या संशोधनामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. द मॅन हू न्यू इनफिनिटी – अ लाईफ ऑफ द जिनियस रामानुजन या रॉबर्ट कानिगेल यांच्या पुस्तकावर आधारित मॅथ्यु ब्राऊन यांनी याच नावाचा चित्रपट काढला. ज्यामध्ये रामानुजन यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

रामानुजन हे स्वयंशिक्षित गणितज्ञ होते. तत्कालीन स्थितीमध्ये इतकी काही संसाधने नसल्याकारणाने त्यांना आधी लागलेल्या शोधांची माहिती नव्हती. लागलेल्या शोधांचा त्यांना स्वत:च्या संशोधनासाठी उपयोग करून घेता आला नाही. या कारणाने त्यांचा अधिक वेळ काही आधीच सिद्ध झालेल्या गोष्टींवर खर्च झाला. मात्र, तरीही त्यांनी आपले संशोधन सातत्यपूर्ण चालू ठेवले. गणित विश्‍वातील अढळ तारा असणारे रामानुजन हे आज सर्व भारतीयांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारतर्फे रामानुजन फेलोशिप ही विज्ञान क्षेत्रातील संशोधनपर शिष्यवृत्ती दिली जाते.

अगोदरच्या काळामध्ये बाहेरच्या देशात जाणे चुकीचे आणि अधार्मिक समजले जायचे. पहिल्यांदा रामानुजन यांनी परदेशात जाणे नाकारले होते. मात्र, केंब्रिज विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्री हॅरल्ड हार्डी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी बाहेर जाण्याचे निश्‍चित केले. पुढे केंब्रिज विद्यापीठात गेल्यानंतर त्यांनी सर हार्डी यांच्या सोबतीने आपल्या संशोधनाला गती दिली. ज्या माध्यमातून त्यांनी असंख्य शोधनिबंध प्रसिद्ध केले.

रामानुजन यांची जयंती 22 डिसेंबरला असते. या दिवशी संपूर्ण देशभर राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. त्यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फक्‍शन आणि अनंत मालिका या क्षेत्रांत आहे. त्यांनी मांडलेल्या चार हजार पेक्षा अधिक सूत्रांपैकी दोन तृतीयांश सूत्रे अगदी नवीन आहेत. त्यातील काही अपवाद वगळता सगळी योग्य आहेत. त्यांचे सगळे कार्य आज रामानुजन्स नोटबुक या नावाने प्रचलित आहे.

1917 साली रामानुजन क्षयरोगाने आजारी पडले. या आलेल्या आजारामुळे त्यांना अधिक प्रखरतेने संशोधन करता आले नाही. 1918 साली त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य व ट्रिनिटी कॉलेजचे अधिछात्र म्हणून सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्याचा पुरेपूर उपयोग करीत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गणिताच्या संशोधनासाठी वेळ दिला. अशा या थोर गणितज्ञास त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.