पिस्टल, रिव्हॉल्वर, रायफल आणि कोयते जप्त
पुणे : हडपसर येथील प्रसिद्ध सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे, एक भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर व सहा काडतुसे, एक बारा बोर रायफल व दोन कोयते अशी हत्यारे तसेच एक फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा स्कुटर असा एकूण 14 लाख 74 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली असून त्यातील पाच जण हे सराईत गुन्हेगार आहेत. विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते (वय 30, रा.पीएमसी कॉलनी डी/82 घोरपडी पेठ), राजू शिरीष शिवशरण (वय 28, रा.सर्वे नंबर 110, ठोंबरे वस्ती), पंकज सदाशिव गायकवाड (वय 34, रा. कोलवडी, ता.हवेली), आकाश राजेंद्र सकपाळ (वय 26, रा. बी/1 फ्लॅट नं 3, रविराज टेरेस, सुखसागर नगर), गणेश मारुती कुंजीर (वय 27, रा. कुंजीर वस्ती, थेऊर), रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय 33 रा. वडगाव शेरी) आणि ऋषिकेश राजेंद्र पवार (वय 19 रा. कोलवडी, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपींवर विविध कलमानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-3 मधील पोलिस नाईक अतुल साठे, हवालदार संतोष शिरसागर, सहायक पोलिस फौजदार किशोर शिंदे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी विशाल सातपुते हा त्याचे साथीदारांसह मगर पट्टा हडपसर येथे एका फ्लॅटमध्ये थांबलेला आहे. तो हडपसर येथील प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे यांनी पथकासह फ्लॅट नंबर 406, मगरपट्टा सिटी येथे छापा टाकून सातपुते याच्यासह त्याच्या इतर 6 साथीदारांना अटक केली.