सातारा -अवैध गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी धनाजी शिवाजी कदम उर्फ डी. के. (रा. सोनावडे, ता. पाटण) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळबीड एमआयडीसी (ता. पाटण) परिसरात अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे व मोबाइल, असा एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत माहिती अशी, तळबीड एमआयडीसी परिसरात एक युवक गावठी पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईच्या सूचना दिल्या. जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (दि. 10) रात्री त्या परिसरात सापळा लावला असता, एक युवक संशयास्पदरित्या एका हॉटेलमध्ये बसल्याचे दिसले. जऱ्हाड हे त्याच्या दिशेने गेले असता, त्याने पळ काढला.
पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्यावेळी त्याने कमरेला दोन पिस्तुले लावलेली आढळली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने तीन जिवंत काडतुसेही काढून दिली. त्याला पुढील कारवाईसाठी तळबीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, संजय शिर्के, आतीश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, मोहसीन मोमीन यांनी ही कारवाई केली.