पेठ – पेठजवळील वलखेडवस्ती नजीक असलेल्या पुलाखाली मांडूळ प्रजातीचा अडीच फुटाचा साप आढळून आला. सदर मांडूळ सापाला पकडून वनविभाग कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वास्तविक मांडूळ हा बिनविषारी साप आहे. मांडूळ ही गांडूळाच्या प्रवर्गातील पण आकाराने मोठी असलेली सापाची जात आहे.
मांडूळ देखील गांडूळा प्रमाणे माती भुसभुशीत करण्याचे काम करत असते. दरम्यान, जमीन भुशभुशीत करण्यासाठी या प्राण्यांना काळ्या किंवा थोड्या पांढऱ्या मातीची जमीन लागते. पण या मातीचा वापर शेतीच्या कामाला करून घेण्याऐवजी दूसऱ्याच कामाला जास्त करून घेतला जातो.
सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी असतो. तसेच याचे तोंड व आखूड शेपटी डोळे लहान, बाहुली उभी अशी प्राण्याची ओळख आहे.
वलखेडवस्ती येथील रामदास पवळे यांनी दैनिक प्रभातचे पत्रकार दिलीप धुमाळ यांना साप आढळून आल्याचे कळविताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनकर्मचारी मारुती पवळे, शंकर तोत्रे, उमेश धुमाळ यांच्या सहकार्याने मांडूळ पकडून वनविभागाच्या हवाली केले.