फलटण – माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचे चिरंजीव पैलवान प्रतीक किशोर पवार (वय 18) याने गुरुवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रतीकच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
पै. प्रतीक पवार अतिशय सुंदर कुस्त्या करीत असत. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने अनेक बक्षिसे मिळवली होती. तो पैलवानकीच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होता. खांदा दुखावला म्हणून आठवड्यापासून तो फलटण येथेच होता.
गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याने घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी प्रतीकला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी प्रतीकचा मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रतीकच्या पश्चात आई, वडील, आजोबा असा परिवार आहे. माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू पवार यांचा तो एकुलता एक मुलगा होता.