सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार

शिवेंद्रसिंहराजे भाजपात येणार नाहीत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नावही चर्चेत आहे. ते भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय राहील, असा प्रश्‍न विचारला असता अभय पवार म्हणाले, “शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये येणार नाहीत. भाजपमध्ये तालुकाध्यक्ष विधानसभेचा उमेदवार ठरू शकतो. उद्या मला उमेदवारी नाकारून अन्य कोणाला दिल्यास मी एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करणार आहे.”

सातारा – सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्याकडून माझ्या नावाचा आग्रह होत आहे. मीही त्यासाठी इच्छुक असून लवकरच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे सातारा तालुका अध्यक्ष अभय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभय पवार म्हणाले, “”मी भाजपमध्ये 2013 मध्ये प्रवेश केला. प्रवेश केला त्याच दिवशी भाजपच्या 13 शाखांचा शुभारंभ केला. तालुकाध्यक्ष या नात्याने पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले. विशेषतः शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. उज्वला, जनधन, घरकुल या योजनांचा लाभ लाभार्थींना मोठ्या प्रमाणावर मिळवून दिला. मजूर नोंदणी, आरोग्य योजना महात्मा फुले योजना, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यात नेहमी पुढाकार घेतला. साधारण 800 मजुरांची नोंदणी करण्यात आम्हाला यश आले.”

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा केली. या चर्चेमध्ये मी निवडणूक लढवावी, अशी मागणी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी मागण्याबाबत मला सर्वांनीच आग्रह केला आहे. तालुकाध्यक्ष म्हणून चार वर्ष काम करीत असताना तळागाळातील लोकांशी संपर्क आणि पक्षातील कार्यकर्त्यांची नेहमी सुसंवाद ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे. विधानसभा मतदारसंघातील 436 बुथपैकी नऊ सोडून सर्व बूथ प्रमुख नेमले आहेत. या जमेच्या बाजू लक्षात घेता तिच्या प्रक्रियेतील सर्व नेत्यांना, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री यांची भेट घेऊन मी उमेदवारीची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)