काशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज

उपअधीक्षकांची घटनास्थळी भेट, भालदार कुटुंबीय मुंबईला गेल्यावर घरफोडी

नागठाणे – काशीळ (ता. सातारा) येथीेल सेवानिवृत्त मंडल अधिकारी गुलाब भालदार यांच्या घरातून 17 तोळे सोन्याच्या दागिन्यांबरोबर सहा हजार रुपये किमतीची चांदी आणि चार लाख रोख रक्कम असा सुमारे सहा लाख 71 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. गुलाब भालदर पत्नीसह शुक्रवारी दि. 12 जुलै रोजी आपल्या मुंबईस्थित मुलास भेटण्यासाठी गेले होते. बुधवारी दि. 17 जुलै रोजी सायंकाळी मुंबईहून ते परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिक माहिती अशी, काशीळ येथील यशवंत हायस्कूलसमोर भालदार यांचा बंगला आहे. पत्नी रमिजासोबत ते याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांची दोन मुले रशीद व सुलतान नोकरीनिमित्त मुंबई व पाचगणी येथे पत्नी व मुलांसह राहत आहेत. शुक्रवारी रात्री भालदार (वय 64) पत्नीसह रशीदला भेटायला मुंबईला गेले. बुधवारी दि. 12 जुलै रोजी वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला भालदार यांच्या घराच्या दरवाजाची कडी- कोयंडा तुटलेला व दरवाजा उघडा दिसला. ही बाब त्याने शेजाऱ्यांना सांगितली.

शेजाऱ्यांनी या प्रकाराची माहिती मुंबईला गेलेल्या भालदार यांना तसेच पाचगणी येथील त्यांच्या मुलास दिली. त्यानंतर पाचगणी व मुंबई येथे असलेले सर्व भालदार कुटुंबीय सायंकाळी काशीळ येथे पोहचले. त्यांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील दोन्ही लोखंडी कपाटे व तिजोरी उघडलेली दिसली. तिजोरीतील 17 तोळ्यांचे सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख चार लाख रुपये असा सुमारे सात लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर भालदार यांनी बुधवारी रात्री उशिरा चोरीची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.

बोरगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्‍वान पथकास पाचारण केले. पोलीस उपअधीक्षक समीर शेख, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, मोबिन मुलाणी, मयूर देशमुख, विजय सावंत, बोरगावचे कर्मचारी राजू शिखरे, किरण निकम, विजय साळुंखे, चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. बोरगाव पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)