बारामती (प्रतिनिधी) – वनविभागाच्या अनुसूचीतील कडुलिंब वृक्षाच्या लाकडाची विनापरवाना तोड, वाहतूक व साठा केल्याबद्दल बारामतीतील कसबा प्रसिद्ध के. के. पेढा या दुकानावर वन विभागाने धडक कारवाई करीत तब्बल एक टन कडुलिंबाचे लाकूड जप्त केले आहे.
के. के. पेढा या दुकानात मोठ्या प्रमाणात कडुलिंब जातीच्या वृक्षाचे लाकूड विनापरवाना साठवून बॉयलरसाठी वापर होत असल्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा करीत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेढा या दुकानावर कारवाई करण्यात आली.
भारतीय वन अधिनियम 1947 चे कलम 41 (2) अन्वये दुकानाचे मालक रमेश शिर्के व ओम प्रकाश यादव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, अंकुश माने, वन कर्मचारी प्रकाश लोंढे यांनी ही कारवाई केली.
Baramati : “कार्यकर्ते पद घेतात अन् नंतर पक्षाला…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
याबाबत वन अपराध पहिले प्रतिवृत्त नोंदवले गेले असून यामध्ये अपराधी रमेश शिर्के व ओम प्रकाश यादव यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रकरण पुढील कारवाईसाठी पुण्याच्या सहायक वनरक्षक यांच्याकडे पाठवल्याची माहिती शुभांगी लोणकर यांनी दिली.