बारामती (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पद घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. पद देण्यासाठी माझ्याकडे पदाधिकारी शिफारस करतात. पद घेतल्यानंतर मात्र कार्यकर्ते पक्षाला वेळ देत नाहीत. अशी खंत अजित पवार यांनी बारामती येथे व्यक्त केली. तसेच निवडणुकीच्या काळात पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात थांबून कामकाज पहावे अशी तंबी देखील त्यांनी यावेळी दिली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच दूध संघ व निरा पुरंदर बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी किमान रविवारी तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे. माळेगाव, छत्रपती, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनने देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसले पाहिजे. आम्हीच काही उक्ते घेतलेले नाही. प्रत्येकाचा प्रश्न सोडविला पाहिजे. मी येथे असताना पदाधिकारी बोलतात, पण माझी पाठ फिरल्यावर काही जण स्वत:ला आमदार, खासदार समजतात. असं कानावर आलं आहे. हे खरं असेल, त्यामध्ये दुरुस्ती करा.
नागरिकांना पदाधिकाऱ्यांनी तासन्-तास ताटकळत ठेवू नये, राष्ट्रवादीचे पदाधिकारी ठेकेदाराला बाजूच्या खोलीत घेऊन बोलतात, असे देखील कानावर आले आहे. असं नाही झालं पाहिजे. ठेकेदाराला ठेकेदाराच्या ठिकाणी ठेवा. बारामतीकरांनी विकास कामांसाठी केलेल्या चांगल्या सूचनांचे आपण स्वागत करू. त्या दृष्टीने बारामतीकरांनी चांगल्या सूचना कराव्यात,अशी सूचना पवार यांनी केली.
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…
सगळ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. काही जण पनवेलला जातात, असे देखील कानावर आले आहे. सत्ता असो वा नसो आपली सामान्य माणसांची नाळ जोडलेलीच पाहिजे. बारामतीत आजकाल विरोधकांच प्रेम ऊतू चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या सभेला सहज देखील त्या ठिकाणी जावू नये. अन्यथा कटु निर्यय घेण्याची वेळ माझ्यावर आणू नये. पद घेतात पण वेळ देता येत नाही. प्रत्येक संघटनेच्या कामाला पदाधिकाऱ्यांनी वेळ देणे आवश्यक आहे. वेळ न देणाऱ्यांची यादी माझ्याकडे द्यावी. त्यानुसार भविष्यात संधी देताना निर्णय घेणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. पुढील काळात हे चालणार नाही असा इशाराही यावेळी पवार यांनी दिला.