पुणे – करोना व्हायरस मुळे गेल्या एक महिन्यापासून विविध उद्योगांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी विविध बॅंकांनी काही तातडीच्या कर्ज योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये इंडियन बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया इत्यादीचा समावेश आहे. वैयक्तिक कर्ज, त्याचबरोबर स्वयंसेवी गटांना तातडीने कर्ज देण्याची व्यवस्था या बॅंकांनी केली आहे. ज्या कालावधीत बॅंकांचे कामकाज सुरू आहे, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी या बॅंकांनी बऱ्याच उपायोजना केल्या आहे.
सध्याच्या खडतर परिस्थितीमध्ये उद्योगांना आणि आमच्या ग्राहकांना भांडवल सुलभता निर्माण व्हावी याकरिता आम्ही बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत, असे इंडियन बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चुंडुरू यांनी म्हटले आहे. युनियन बॅंक ऑफ इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्याच्या खडतर परिस्थितीमध्ये आमच्या ग्राहकासाठी आम्ही करोना इमर्जन्सी लाइन ऑफ क्रेडिट ही योजना सुरू केली आहे.
बॅंक ऑफ इंडियानेही सध्याच्या परिस्थितीत तत्काळ कर्ज उपलब्ध करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. अशा योजना भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने अगोदरच सुरू केली आहेत. छोट्या ग्राहकाबरोबरच मोठ्या कंपन्यासाठीही सध्याच्या काळामध्ये भांडवल सुलभता निर्माण होणे गरजेचे आहे.
त्यांच्यासाठीही या बॅंकांनी विविध योजना सुरू केल्या आहेत. व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर विविध उद्योगांना आणि नागरिकांनी मोठ्या ताकतीने कामाला लागण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असेही बॅंकांनी स्पष्ट केले आहे.