पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रेल्वे प्रवासात आणि स्थानकावरील प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) ठिकठिकाणी पथकाच्या माध्यमातून कारवाईची मोहीम तीव्र केली. मागील दोन दिवसांत पाच चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 7 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
रेल्वेतील वाढत्या चोरी आणि लुटमारीच्या घटनांविरोधात आरपीएफ कारवाई मोहीम तीव्र केली आहे. त्यानुसार गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथक (सीपीडीएस) अंतर्गत आरपीएफ कर्मचारी रेल्वेसह स्थानकावर कसून तपासणी करत आहे. त्यामध्ये संशयित व्यक्तींची तपासणी करून सीसीटीव्हीद्वारेही नजर ठेवली जात आहे. वडाळा रोडवरील कुर्ला स्थानकावर संशयीत व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून रेल्वेत प्रवाशाचा चोरी केलेला 23 हजाराचा मोबाइल जप्त करण्यात आला.
रिझवान शेख असे आरोपीचे नाव आहे. तसेच ट्रेनमधून उतरून पळताना इहपक वाघरी याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. दशरथ ठाकूर याच्याकडून 32 हजाराचे दोन सॅमसंग कंपनीचे मोबाइल, तर भुसावळ येथे दोन संशयितांना ताब्यात घेतल्यावर चोरीचे दोन मोबाइल सापडले. या सर्व आरोपींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.