सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात 14 ठिकाणी आणि अन्य जिल्ह्यांमध्ये घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीने केलेल्या घरफोडीच्या 18 आणि चोरीच्या आठ गुन्ह्यांचा तपास करून, पोलिसांनी 40 लाख पाच हजार रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रोहन बिरू सोनटक्के (रा. मुरूम, ता. उमरगा, जि. नगर), महेंद्र रमाबाई राठोड (रा. कुसेगाव, ता. दौंड, जि. पुणे), संदीप झुंबर भोसले (रा. वाघोली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या टोळीतील सोनटक्के आणि आणखी एकाने दि. 13 मार्च रोजी खेड (ता. सातारा) ग्रामपंचायत हद्दीतील एका घरामधील कपाटातून नऊ लाख 29 हजार पाचशे रुपये किमतीचे, 29 तोळे सहा ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून संशयितांची माहिती मिळवली.
पोलीस अभिलेख्यावरील गुन्हेगार सुनील उर्फ सुशील बबन भोसले (रा. रामनगर, कटकेवाडी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याने केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून घरफोडीचे 12 आणि चोरीचे दोन 14 गुन्हे उघड करून, 13 लाख 19 हजार 900 रुपये किमतीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेला बोर्ड कटर व स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आला आहे.
सोनटक्के, राठोड, भोसले व दोन अल्पवयीन मुलांनी पुणे व सातारा जिल्ह्यात घरफोड्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या टोळीने केलेले 12 गुन्हे उघडकीस आणून, 24 लाख 45 हजार पाचशे रुपये किमतीचे, 36 तोळ्यांचे दागिने आणि 40 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात येऊन गुन्हे करायचे आणि इतर जिल्ह्यात पळून जायचे, अशी संशयितांची पद्धत होती, असे शेख यांनी सांगितले.