वडापुरी, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील महादेव संपत खबाले या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात केलेल्या तैवान पिंक पेरूची शेती त्यांच्यासाठी घराला आधार ठरली आहे. शाहूपुरी तालीम कोल्हापूर येथील लाल मातीत कुस्ती खेळणारा महादेव गावाकडे आल्यानंतर शेतीकडे वळला. शेतीतील आधुनिक ऊस पिकाकडे दुर्लक्ष करून महादेव खबाले यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पेरू, डाळिंब, बोरे व टोमॅटो, अशी विविध पिके घेण्यास सुरुवात केली.
सध्या हाफ सीझनमध्येही तैवान पिंक पेरूची शेती यशस्वीपणे केली आहे. सध्या या पेरुस प्रतिकिलोस ४० रुपयांचा भाव मिळत असून अवघ्या एक एकराच्या तोड्यांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. खबाले यांनी एक एकर क्षेत्रात तैवान पिंक पेरूची लागवड केली होती. त्यानंतर आठ ते नऊ महिन्यांनी पेरूची तोड सुरू झाली.
यावर्षी प्रत्येक झाडास जवळपास दीडशे पेरू लागले आहेत. सध्या पेरूंची तोडणी सुरू झाली असून प्रतिकिलोस ४० रुपयांचा भाव मिळत आहे. पेरूच्या बागेची चांगली देखभाल केल्याने झाडेही अतिशय चांगली झाली आहेत. विशेष म्हणजे खबाले यांचा पेरू सध्या चंदीगड येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. सध्या खबाले यांनी सहा एकर जमिनीत पेरूची लागवड केली असून हंगामात पेरू बाजारात विक्रीसाठी येतील. यासाठी त्यांना खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंजाबराव गायकवाड व कृषी सेवक किशोर कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
जून महिन्यात एक एकर क्षेत्रात आठ बाय चारमध्ये १ हजार ३२९ तैवान पिंक पेरूच्या रोपांची लागवड केली. पेरूचा चांगला आकार व्हावा म्हणून फळांना फम लावले असून त्यावर प्लॅस्टिक पिशवी घातली. त्यामुळे आज पेरूचा आकार चांगला झाला असून पेरूंना चमकही चांगली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये या पेरूला चांगली मागणी आहे. चंदिगड पंजाब येथील व्यापाऱ्यांनी पेरू खरेदी केला आहे. – महादेव खबाले, पेरूउत्पादक- भाटनिमगाव.